राष्ट्रवादीच्या २७ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा, भाजपचा दावा
अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या गटाला त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना कोणती मंत्रिपदं दिली जाऊ शकतात यावरही बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे. १० पेक्षा जास्त आमदारांना मंत्रिपद तर उरलेल्या आमदारांना महामंडळ देण्याचं भाजपने अजित पवारांना आश्वासन देण्यात आलं आहे.
अजित पवार यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ पवारही आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, विनोद तावडे आणि भुपेंद्र यादव उपस्थित आहेत.
शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. याप्रकरणाची आज सुनावणी झाली. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना प्रतिवादी केले.
याप्रकरणाची उद्या पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होईल. या मंत्रिमंडळ बैठकीत विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत राज्यपालांना प्रस्ताव दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.