मुंबई : भांडूपमध्ये राहणारी २७ वर्षाची मुलगी आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेले कित्येक दिवस समाज आणि कुटुंबाशी झगडत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेश्मा मोकेनवार गेल्या वर्षी तेलंगणात एका कौटुंबिक कार्यक्रमात २० वर्षाच्या प्रिथी सरकिलाला भेटली. त्या कार्यक्रमात पहिल्यांदाच भेटून दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. त्याच्या या समलिंगी प्रेम प्रकरणाला कुटुंबाकडून कडाडून विरोध झाला. यानंतर या दोघी गेल्या महिन्यात शिर्डीला पळून गेल्या. आणि आपल्या प्रेमाची नवी सुरूवात करू या उद्देशाने एकत्र राहू लागल्या. 


काय आहे यांच्या समलिंगी प्रेमाची कहाणी? 


शिर्डीतील एका हॉटेलमध्ये काम करून त्या तिथेच राहू लागल्या. मात्र त्यांच्या मार्गावर असलेले कुटुंबिय अखेर त्यांच्याकडे पोहोचले. आणि तेलंगणा पोलिसांनी १० दिवसापूर्वी दोघींना शिर्डीतून ताब्यात घेतले. रेश्माने यासंबंधी माहिती देताना सांगितले की, पोलिस आम्हाला तेलंगणातील अदिलाबाद येथे घेऊन गेले जिथे तक्रार नोंदवली होती तेथे घेऊन गेली. इथे कुटुंबियांनी खोटी-नाटी आश्वासनं देऊन, तुम्हाला हवं तसं जगू देऊ, असं सांगून घेऊन गेल्याचं रेश्माने सांगितलं. मात्र पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच, हात मुरगळून आमच्या कुटुंबियांनी आम्हाला वेगवेगळ्या गाडीत घालून घेऊन गेले, असं रेश्मा म्हणाली.


सध्या रेश्मा नांदेडमध्ये कुटुंबाच्या नजरकैदेत आहे. तर प्रीतीला तिच्या कुटुंबीयांनी तेलंगणात आपल्याजवळ ठेवलं आहे.रेश्माचं असं म्हणणं आहे की, आम्ही आमच्या कुटुंबियांना त्रास देणार नाही. मात्र त्यांनी आम्हाला मुक्तपणे राहायला द्यावे. आम्हाला आमच्या मार्गाने जगू द्या. 


कुटुंबाला हे का मान्य नाही? 


यावर तिरूपती मोकेनवार जे रेश्माचे काका आहेत त्यांनी अशी माहिती दिली की, आम्ही या दोघींना एकत्र राहण्याची परवानगी अजिबात देणार नाही. ही आपली संस्कृती ही नाही आणि आमच्या कुटुंबात असं कधीच झालेलं नाही. आम्ही प्रिथीसाठी एखादा चांगला वर बघत आहोत. जेणे करून आम्ही तिचं पुढील २ महिन्यात लग्न करू. 


प्रेम केलं यात आमचा काय दोष? 


माझं आणि प्रीतीचं एकमेकींवर प्रेम आहे, आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे सोबत राहायचं आहे. पोलीस स्टेशनबाहेर आम्ही आमच्या कुटुंबालाही तसं सांगितलं. आम्ही कुटुंबाला त्रास देणार नाही, कुटुंबापासून दूर राहू, असं रेश्माने सांगितलं. रेश्मा घटस्फोटित आहे, ती सज्ञान होण्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. गेल्या दहा वर्षांपासून ती मुंबईत राहत होती. मेडिकलमध्ये काम करुन ती गुजराण करायची.