मुंबई विद्यापीठाचे २८ हजार पेपर गहाळ
मुंबई विद्यापीठाचे ५७ हजार ८९९ पेपर तपासणं अजून बाकी असून, तब्बल २८ हजार पेपर गहाळ झाले आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे ५७ हजार ८९९ पेपर तपासणं अजून बाकी असून, तब्बल २८ हजार पेपर गहाळ झाले आहेत. निकाल जाहीर करायला सतत झालेल्या चालढकलीमुळे टीकेचं धनी झालेल्या मुंबई विद्यापीठानं पहिल्यांदाच पत्रकार परीषद घेतली.
मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉक्टर देवानंद शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत आपल्या कार्याचा आढावा घेताना ही माहिती दिली. एक महिन्याच्या कालावधीत १८० पैकी १७२ परीक्षांचे निकाल आपण जाहीर केले असून, आता अवघ्या ८ परीक्षांचे निकाल घोषित होणं बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं.
तसंच या एक महिन्यात सव्वा सतरा लाखांहून जास्त पेपर तपासून झाले असल्याचं ते म्हणाले. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्याचा दावाही त्यांनी केला. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या पुढल्या परीक्षांची तपासणी ऑनलाईन होणार याबाबतचा निर्णय मात्र अजूनही प्रलंबितच आहे.