कृष्णात पाटील, मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिकेनं दरड कोसळण्याची शक्यता असलेली २८७ ठिकाणं निश्चित केली आहेत. सुमारे २२ हजारांहून अधिक झोपड्या दरडीच्या छायेत आहेत. त्यामुळं पावसाळ्यात इथं राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील साकीनाका भागात याच ठिकाणी २६ जुलै २००५ च्या पावसात दरड कोसळून ८२ लोकांचा मृत्यू झाला होता. १२ वर्षांचा काळ लोटला तरी इथल्या परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. दरडीच्या वरच्या आणि खालच्या भागातही दरडीच्या टोकापर्यंत झोपड्या वाढल्यात. पुन्हा दरड कोसळली तर २००५ पेक्षा जास्त भयानक दुर्घटना इथं होऊ शकते. गेल्या १२ वर्षात म्हाडाकडून साधी संरक्षक भिंत इथं बांधली गेलेली नाही. अशी जवळपास २८७ ठिकाणे मुंबईत आहेत. 


दरड कोसळण्याची शक्यता असलेली सर्वाधिक १६१ ठिकाणे ही एकट्या एस वॉर्डमध्ये आहेत. यामध्ये भांडूपमधील टेंभीपाडा, साईविहार, नरदासनगर, प्रतापनगर अशा ठिकाणांचा समावेश आहे. आहेत. एन वॉर्डमध्ये ३०, तर एल वॉर्डमध्ये अशी १५ धोकादायक ठिकाणे आहेत.
 
पालिका आणि म्हाडाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्यानं तब्बल १ लाखांहून अधिक झोपडीवासियांना यंदाच्या  पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावं लागणार आहे.


सालाबादप्रमाणे यंदाही मुंबई महापालिकेने डोंगरउतारावर, दरडीच्या छायेत राहणाऱ्या रहिवाशांना नोटीसा पाठवून स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले आहे. त्याठिकाणी संरक्षण भिंती उभारण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने दिल्या आहेत.


एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय सरकार जागं होत नाही, असं म्हणतात. मात्र साकीनाका दुर्घटनेला १२ वर्षं होऊनही सरकार आणि महापालिकेला अजून जाग आलेली नाही.