मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी धारावीत केवळ एक कोरोना रुग्ण आढळला होता. मात्र रविवारी धारावीमध्ये कोरोना रुग्ण संख्या 36ने वाढली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2480वर पोहचला आहे. तर दादरमध्ये 15 आणि माहिममध्ये 17 कोरोना रुग्ण वाढले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार होण्यास सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत धारावीत दररोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडत होते. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत अत्यंत दाटीवाटीची वस्ती असल्याने मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती वर्तविली जात होती. मात्र, यानंतर मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने धारावीत केलेल्या आक्रमक उपाययोजनांमुळे धारावी परिसरातील कोरोनाचा प्रभाव हळू-हळू कमी होण्यास सुरुवात झाली. 


दरम्यान, देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या एकट्या मुंबईत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा आकडा पार केला आहे. सध्या मुंबईत 23 हजार 917 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून आतापर्यंत 70 हजार 492 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मुंबईत 5650 जणांचा मृत्यू झाला आहे. 


दरम्यान, सध्या पुण्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. याशिवाय, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरातही कोरोनाच्या रुग्णांचं प्रमाण वाढल्याने स्थानिक यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झालं आहे.