मुंबई : कोरोना संकटामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण अडकले आहेत. जे अडकले आहेत त्यांच्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था तसेच कोरोना संक्रमन होण्याचा धोका आहे, अशांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. राज्यामध्ये ४७३८ मदत शिबीर केंद्र असून या मदत शिबिरात १ लाख ३५ हजार बेघरांना आश्रय देण्यात आला आहे. मदत शिबिरात त्यांना नाश्ता, जेवण आणि इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. कारोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ४ लाख ३५  हजार व्यक्तींना होम क्‍वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन काळात विनाकारण वाहनासह फिरणाऱ्यांकडून ३ कोटी ५६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ५३,३३० वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच जिल्हा बंदी असताना जे लोक दुधाची गाडी, टॅंकर, सिमेंट मिक्शर किंवा इतर वाहनाने प्रवास करत होते अशा १२८१ अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.


आठ कारागृह क्‍वारंटाईन



लॉकडाऊनच्या काळात राज्यातील कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील आठ करागृह क्‍वारंटाईन करण्यात आले होते. कारागृहातील कर्मचाऱ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली होती. या काळात बाहेरचा व्यक्ती कारागृहात प्रवेश करु शकत नव्हता तसेच मधील व्यक्ती कोणत्याही कामाने बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये स्वयंपाकी याला कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कातील ७२ कैद्यांना देखील कोरानाची लागण झाली आहे. या कैद्यांना बृहमुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यांने महानगरपालिका क्षेत्रात क्‍वारंटाईन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.


यांच्यासाठीही राहण्याची व्यवस्था करण्‍याचा विचार 


आवश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी मुंबईत कार्यरत असून त्यांचे निवासस्थान मुंबईच्या बाहेर आहे. अशा अधिकारी, कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था करण्‍याचा विचार राज्य शासन करत आहे. राज्य शासनाने कोव्हिड-१९ बाबत नागरिकांना जनजागृती व्हावी तसेच त्यांना योग्य माहिती  मिळावी या उद्देशाने हेल्पलाईन चालू केली आहे. नागरिकांनी या हेल्पलाईनला प्रचंड प्रतिसाद देत ८ लाख ५३ हजार नागरिकांनी या हेल्पलाईनच्या माध्यमातून संपर्क साधला असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.