Woman jumps off Atal Setu: शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर रविवारी एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किंजल शहा या महिलेने समुद्रात उडी घेत आपले जीवन संपवले आहे. न्हावा शेवा पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अटल सेतूवरुन आत्महत्येचा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. किंजल शहा (43) या डॉक्टर आहेत. परंतु गेल्या दहा वर्षांपासून त्या नैराश्यात होत्या. नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. किंजल या दादरच्या नवीन आशा इमारतीत त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होत्या. बाहेर काम आहे असं सांगून ती रविवारी घरातून सकाळी निघाली होती. त्यानंतर अटल सेतूवर येऊन तिने समुद्रात उडी घेतली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किंजल यांनी वडिलांना जरा बाहेर जाऊन येते असं सांगून रविवारी घराबाहेर पडल्या, त्यानंतर त्यांनी शिंदेवाडी येथून टॅक्सी पकडली व निघून गेल्या. त्या खूप वेळ झाला तर परतल्या नसल्याने त्यांच्या वडिलांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र, त्यानंतर कुटुंबीयांना सुसाइड नोट सापडली. या सुसाइड नोटमध्ये तिने अटल सेतूवर आत्महत्या करण्यासाठी जात असून टॅक्सी चालकास त्रास देऊ नये, असे लिहले होते. पोलिसांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. 


अटल सेतूवरुन युटर्न घ्यायला सांगितला 


किंजल यांनी अटल सेतूवर गेल्यानंतर चालकाला पुन्हा टॅक्सी मुंबईच्या दिशेने वळवायला सांगितली. तिने सांगितल्यानुसार त्याने टॅक्सी पुन्हा माघारी वळवली. त्यानंतर किंजल यांनी टॅक्सी बाजूला थांबवण्यास सांगितली. मात्र टॅक्सी चालकाने नकार दिला. अखेर किंजलने त्याला कसं तरी करुन टॅक्सी थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर किंजल यांनी संधी साधत समुद्रात उडी घेतली. 


किंजल यांनी आत्महत्या केल्यानंतर शिवडी न्हावा पोलिसांना माहिती दिली. मात्र सोमवारी संध्याकाळी उशिरा भोईवाडा पोलिसांनी न्हावा शेवा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर महिलेची ओळख पटली. मात्र त्या आधी भोईवाडा पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती. ही महिला दादरहून 1.45 वाजता टॅक्सीत बसल्याचे आढळले होते. त्या दिशेने पोलिसांनी तपासास सुरुवात केली होती. 


न्हावा शेवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅरिकेडिंगचे काम सुरू होते तिथूनच महिलेने उडी घेत आत्महत्या केली.