मुंबई : नव्या वर्षाला आजपासून सुरुवात झालीये. या नव्या वर्षात नव्या संकल्पांसोबतच बचतीचा संकल्पही प्रत्येकाने सोडायला हवा. नवीन वर्षात बचतीचे प्लानिंगही गरजेचे आहे. मात्र त्यासाठी सुरुवातीपासून याची तयारी व्हायला हवी. सुरक्षित गुंतवणुकीसाठी कोणत्या योजनेत अथवा फंडमध्ये पैसे गुंतवायला हवे याची पुरेपुर माहिती असणे गरजेचे असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंतवणुकीसाठी केवळ पुरेसा पैसा असून फायदा नाही तर गुंतवणुकीचा चांगल्या पर्यायाची माहिती असणेही गरजेचे असते. अशा ठिकाणी गुंतवणूक करावी जी सुरक्षित तर असेल मात्र त्याबरोबरच त्यातून रिटर्न्स चांगले मिळतील. जाणून घ्या २०१८मध्ये गुंतवणूक करण्याचे असे पर्याय जिथे तुम्हाला सुरक्षिततेसोबतच चांगले रिटर्न्स मिळू शकतात. 


या पाच ठिकाणी करा गुंतवणूक


सुकन्या समृद्धी योजना


ही सरकारी योजना आहे. यात पैशांची गुंतवणूक सुरक्षित असते. १० वर्षाहून कमी वयाच्या मुलीच्या नावावर बँक अथवा पोस्टात खाते उघडावे लागते. योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा अवधी १४ वर्षांपर्यंत आहे. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर ही पॉलिसी मॅच्युअर होईल. तसेच या योजनेत ८.१ टक्के व्याज मिळते. या योजनेत दरवर्षी कमीत कमी एक हजार रुपये आणि अधिकाधिक दीड लाख रुपये गुंतवता येतात. 


पीपीएफ


२०१८मध्ये गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणजे पीपीएफ. पीपीएफचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात जमा केलेल्या रकमेवर मिळणारे व्याज हे टॅक्स फ्री असते. इतकंच नव्हे तर व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कमही टॅक्स फ्री असते. पीपीएफनवर सध्या वर्षाला ७.६ टक्के व्याज मिळते. दर तीन महिन्यांनी पीपीएफच्या व्याजदराची समीक्षा केली जाते. या अकाऊंटमध्ये तुम्ही वर्षाला कमीत कमी ५०० रुपये आणि अधिकाधिक दीड लाख रुपये गुंतवू शकता. 


लिक्विड फंड


नव्या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी लिक्विड फंड हा चांगला पर्याय आहे. या फंडमध्ये बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या तुलनेत अधिक रिटर्न्स मिळतात. याशिवाय या फंडमधून पैसे काढणेही सोपे होते. गेल्या वर्षी एका वर्षात अधिकतर लिक्विड फंड योजनांनी ९ टक्के रिटर्न देण्यात आले. लिक्विड फंड एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे यात जोखीम कमी असते.यात कोणताही लॉक इन पिरिअड नसतो. म्हणजेच गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीही पैसे काढू शकता. ही योजना बँक अथवा पोस्ट ऑफिसच्या आरडीप्रमाणे काम करते. 


पोस्ट ऑफिस


बँकांकडून व्याजदर घटवले जात असताना दुसरीकडे मात्र पोस्ट ऑफिसमधील अनेक बचत योजनांवरील व्याजदर कायम आहे. बँकांमध्ये ६ ते ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. तर पोस्टात बचत योजनांमध्ये ७.९ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. 


सरकारी बाँड्स


बँकेत गुंतवणुकीपेक्षा सरकारी बाँड्समध्ये पैसे गुंतवणे हा अधिक चांगला पर्याय आहे. बँकांमध्ये तुम्हाला अधिकाधिक ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. तर सरकारी बाँड्सवर सध्या ७.८ टक्के व्याज मिळते.