निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला एकहाती यश मिळताना दिसत आहे. या विजयाचे दूरगामी परिणाम आतापासूनच दिसण्यास सुरुवात झाली आहे. अगदी अर्थक्षेत्रही यास अपवाद नाही. (Share Market) तीन राज्यात भाजपची सत्ता आल्यावर आज शेअर बाजारात तूफान तेजीचे संकेत मिळत आहेत. आधीच सर्वोच्च पातळीवर बंद झालेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज पुन्हा एकदामोठ्या उसळीसह उघडेल अशी चिन्हं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकडे अमेरिकत व्याजदर कपातीचे संकेत स्पष्ट दिसत आहेत त्याचा परिणाम म्हणून अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांकही आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहे. त्याचाही सकारात्म परिणाम आशियाई बाजारात बघयाला मिळतोय. इकडे भारतासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कच्च्या तेल्याच्या किमतीही 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात अर्थव्यवस्थेच्या वाढीला नवी उभारी मिळेल असं चित्र आहे शिवाय रिझर्व्ह बँकेने उचलेली पावले आणि कच्च्या तेलाचे घरणारे दर याचा एकत्रित परिणाम महागाईवरील नियंत्रण आणखी मजबूत होईल असा बाजार तज्ज्ञांचा होरा आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराला नवी उंची गाठणं सोपं होणार आहे.


एकूण बाजारतील तेजीमुळे भारतातील दहा कोटींपेक्षा जास्त गुंतवणूकदारांना पुढचा काळ सुगीचा असणार आहे असं चित्र दिसतंय. रविवारी म्हणजे 3 डिसेंबरला भाजपाने मिळवलेल्या तीन राज्यातील विजयानंतर देश आणि विदेशातील अनेक गुंतवणूक सल्लागार कंपन्यांनी भारतीय बाजारातील तेजी पुढील वर्षात आणखी मजबूत होईल असं भाकित वर्तवलं आहे.


पुन्हा गुंतवणुकीला वाव 


मोतीलाल ओसवाल शेअर बाजारातील एका मोठ्या ब्रोकरेज फर्मने तर शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये पुढील सहा महिन्यात 20 ते 25 टक्के तेजी येईल असं म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यापासून स्वतःला दूर ठेवताना दिसत होते. गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या वर्षभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकरादांनी चार ते साडे चार लाख कोटी रुपये भारतातून काढून घेतले आहेत. रविवारच्या भाजपाच्या दमदार विजयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेविषयी परदेशी गुंतवणूकदारांच्या मनातील किंतू- परंतू दूर होऊन तेही पुन्हा एकदा बाजारात गुंतवणूक करतील असही अनेक गुंतवणूक करतील असे शेअरखान या ब्रोकरेज फर्मचे म्हणणं आहे.


हेसुद्धा वाचा : '...म्हणून मतदार भाजपाला निवडून देतात'; मोदींकडून 2024 च्या 'हॅट-ट्रिक'ची भविष्यवाणी


 


पुढील काही दिवसात सरकारी कंपन्या, पायाभूत सुविधांची उभारणी करणाऱ्या कंपन्या, संरक्षण क्षेत्रातील कंपन्या, सिमेंट आणि स्टील कंपन्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला 'झी बिझनेस' (Zee Bussiness) वर गुंतवणूक सल्लागरांनी दिला आहेगेल्या अनेक दिवसांपासून थंड असणाऱ्या सरकारी बँकांचे शेअर्स पुन्हा एकदा मोठी खरेदी परत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही गुंतवणूकदार सल्लागारांनी अदाणी समूहाच्या कंपन्यांमध्ये तेजी येण्याचे भाकित वर्तवण्यात येत आहे.