दिवसभरात राज्यात ५१३४ नवे कोरोना रुग्ण; २२४ जणांचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत एकूण 1,18,558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून आज मंगळवारी 5134 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,17,121 इतकी झाली आहे.
आज एका दिवसांत 224 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यांत एकूण 9250 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के इतका आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याची दिलासादायक बाबही समोर येत आहे. आज राज्यात 3296 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत एकूण 1,18,558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 54.6 टक्के इतका आहे.
राज्यात सध्या 89,294 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईत आतापर्यंत 86509 कोरोना रुग्ण आढळले असून 5002 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत सध्या 23359 रुग्णांवर उपचार सुरु असून 58137 जण कोरोनातून बरे झाले आहेत.
मुंबईसाठी कोरोनाबाबतची एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत धारावीत कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. कित्येक दिवसांपासून कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीमध्ये आज केवळ एक कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे धारावीमध्ये काही प्रमाणात का होईना कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यात यश मिळत असल्याचंच चित्र आहे.