मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३०९४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १२३३ नवीन रुग्ण वाढले. मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, पुणे या भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याचं चिंता वाढल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत ५१ पोलीस अधिकाऱ्यांना आणि ४८० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर तैनात असलेल्या काही पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. 


आतापर्यंत ३९ कोरोनाबाधित पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आतापर्यंत ५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात १६३ पोलिसांवर लॉकडाऊनच्या काळात हल्ले झाले असून यात ७३ पोलीस जखमी झाले आहेत तर ६८३ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.


नाकाबंदी,  गस्त यामुळे पोलिसांची लोकांशी थेट संपर्क होत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांचा आकडा प्रशासनासाठी देखील चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील पोलिसांवर अतिरिक्त ताण येतो आहे. लॉकडाऊनमुळे बंदोबस्त, नाकाबंदी आणि आता मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी सुरु असलेली एकूण कामं यामुळे पोलिसांवर ताण वाढतो आहे.