मुंबईत ६० कोरोनाबाधित; १२ रुग्णांना डिस्चार्ज
पालिका प्रशासनाची माहिती...
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. असं असलं दुसरीकडे अनेक रुग्ण यातून बरे होत असल्याचं दिलासादायक चित्रही आहे. मुंबईत आतापर्यंत 60 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आधी 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आणखी 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतरही त्यांना घरी जाऊन फॉलोअप घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, डॉ. दक्षा शाह यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात 113 संशयितांना आयसोलेशनमध्ये भरती करण्यात आलं आहे. दरम्यान, 27 मार्च रोजी एकूण 9 कोरोनाबाधित रुग्ण आढलले. त्यापैकी 6 मुंबईतील तर 3 मुंबईबाहेरील आहेत. कोरोनाबाधित असलेल्या 50 टक्के रुग्णांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याचा इतिहास आढळून आला आहे.
ज्या रुगणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे, किंवा ज्यांना कोरोनासंबंधी कोणतीही लक्षणं आढळल्यास घाबरुन न जाता, त्या सर्वांनी महापालिकेमध्ये स्क्रिनिंग ओपीडी किंवा आयसोलेशन सेंटरमध्ये आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करुन घेणं आवश्यक असल्याचं माहापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
नागरिकांनी घाबरुन न जाता शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. घरी राहणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचं आहे. मुंबई महापालिकेकडून होम टेस्टिंगची सुविधाही आजपासून सुरु करण्यात आली आहे.
मुंबईतील अनेक मोठ्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरु असून आतापर्यंत 3500 पर्यंतचे मोठे-मोठे परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. यात ऑफिसेस, अॅम्ब्युलन्स, रुग्णालयं, पोलीस स्टेशन, आयसोलेशन केंद्र, मार्केट परिसर निर्जंतुकीकरण केलं जात असल्याचं पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. कोणीही घाबरुन न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आणि स्वच्छता राखण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.