मुंबई : राज्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात एकाच दिवसात ७४९ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून कोणीही घाबरुन जावू नये. योग्य ती काळजी घेतली तर आपण त्यातून बाहेर पडू शकतो, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. सोमवारी २०३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात उभारण्यात आलेल्या कोविड १९ समर्पित आरोग्य केंद्राचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी सुमारे १ हजार रुग्णांवर उपचार होऊ शकतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.



राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १६८१ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून सोमवारी एकूण १४ हजार ४१ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६०.४७  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


दरम्यान, आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ८२ हजार १९४ नमुन्यांपैकी २ लाख ४७ हजार १०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३५ हजार ५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ६६ हजार २४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १८ हजार ६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



राज्यात सोमवारी ५१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद  झाली असून एकूण संख्या १२४९ झाली आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २,नागपूर शहरात २, भिवंडी १ तर पालघरमध्ये १  मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील १ मृत्यू मुंबईत झाला आहे. नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३५ पुरुष तर १६ महिला आहेत.आज झालेल्या ५१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.