मुंबई  : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. ब्रिटन स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळले असून ते विलगीकरणात आहेत. ते ज्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेतो आहे. तसेच नवी नियमावली आम्ही खूप काटेकोर राबवत आहोत. आठ रुग्ण आढळल्याने लोकांनी काळजी घेतली पाहिजे, घाबरू नका. या नव्या स्ट्रेनचा वेगाने प्रसार होतो, त्यामुळे सजग राहिले पाहिजे. असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नियम जनहितासाठी करतो ते सगळ्यांनी पाळले पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो.  या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर कायदा सगळ्यांनी पाळला पाहिजे. ७ जानेवारी रोजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांबरोबर व्हीसीद्वारे बैठक आहे. ८ तारखेला सर्व जिल्ह्यात लसीकरणाचा ड्राय रन होईल. काही त्रुटी आहेत का हे तपासण्यासाठी हा ड्राय रन होईल. आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये समन्वय आहे का, इंटरनेटची अडचण आहे का हे तपासले जाईल.' असं ही टोपे यांनी म्हटलं आहे.


'राज्यात आज २ हजारच्या घरात रुग्ण वाढत आहेत. वाढ कमी झाली आहे. मृत्यूदर १ टक्के आहे, तोही कमी झाला आहे. ९६ टक्के रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आहे. नवा स्ट्रेन आलाय त्याबाबत आपण इतर राज्यांपेक्षा सतर्क आहोत. केंद्र सरकारला आम्ही पत्र लिहणार आहोत. युकेच्या फ्लाईटस् ७ तारखेपासून सुरू होणार आहेत.  त्याचा प्रोटोकॉल ठरवावा. दुसऱ्या राज्यातही खबरदारी घ्यावी अशी विनंती केंद्राला करणार आहोत. लोकल ट्रेन, नाईट कर्फ्यू याबाबत मुख्यमंत्री यांच्या स्तरावर निर्णय होईल.' असं ही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


'लसीकरणाबाबत मी आरोग्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. गरीब आहेत त्यांना लस मोफत दिली पाहिजे. श्रीमंत लोकं विकत लस घेऊ शकतात. गरीब लोकांना ५०० रुपये खर्च लादणं योग्य नाही, त्यांना मोफत लस द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे. जर केंद्राने याबाबत काही केलं नाही राज्य याबाबत विचार करेल. दोन लसी आहेत कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिव. आपत्कालीन परिस्थिती लस कंपन्यांना परवानगी दिली आहे. याबाबत राज्य सरकार स्पष्टीकरण मागवणार आह. बर्‍याच गोष्टीत स्पष्टता नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रांच्या व्हीसीमध्ये याबाबत आम्ही विचारणा करू.' असं ही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.