मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती 30 जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्दैश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सीजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.


राज्यातील ऑक्सीजनची वाढती गरज लक्षात घेता साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्प्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सीजन पैकी 80 टक्के वैद्यकीय वापराकरीता तर उर्वरित 20 टक्के औद्योगिक वापराकरीता पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. 


रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्याला प्राधान्य द्यावयाचे असून वैद्यकीय क्षेत्राला 80 टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासल्यास त्याचा पुरवठा करायचा असे स्पष्ट निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.