९० टक्के काँग्रेस आमदार शिवसेनेसोबत जाण्यास सकारात्मक
काँग्रेस मात्र शिवसेनेच्या जास्त जवळ जाताना दिसत आहे.
मुंबई : एकीकडे भाजपा-शिवसेनेमधील दरी रोज वाढत असताना दुसरीकडे काँग्रेस मात्र शिवसेनेच्या जास्त जवळ जाताना दिसत आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेबरोबर जावं असं राज्यातील ९० टक्के काँग्रेस आमदारांना वाटतं आहे. याबाबत राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेही सकारात्मक आहेत. राज्यातील काँग्रेस आमदार आणि नेत्यांची याबाबत मतं जाणून घेण्याचा प्रयत्न दिल्लीतूनही सुरू आहे. तर राज्यातील दुसऱ्या फळीतील काँग्रेसचे नेते आपले मत पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्यासाठी त्यांना भेटण्याची शक्यता आहे.
सत्तासंघर्षाचा आज १५वा दिवस आहे. अजूनही तिढा मिटलेला नसला तरी आज महत्त्पूर्ण घडामोडी होणार आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या बैठका असल्यामुळे आज सत्तास्थापनेच्या दिशेनं काही पावलं पडण्याची चिन्ह आहेत. भाजपाचे नेते आज राज्यपालांना भेटणार आहेत. त्यामुळे भाजपा सत्तास्थापनेबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.
दुसरीकडे शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख काय भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता आहे. मात्र शिवसेना आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार असल्यामुळे आता आमदारांच्या फो़डाफोडीच्या चर्चेलाही ऊत आलाय. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेबरोबर जावं असं राज्यातील ९० टक्के काँग्रेस आमदारांना वाटतंय. त्यामुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
संजय राऊतांच्या 'सिल्व्हर ओक'वर फेऱ्या वाढल्या आहेत. भाजप १०५ वर अडलेली असताना भाजपाचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही, हा सूर शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीत वाढत चालला आहे. शिवसेनेबरोबर जाण्यास अद्यापही काँग्रेसची संमती नसली तरी शिवसेनेला सशर्त पाठिंबा देण्याबात काँग्रेस सकारात्मक असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. केंद्रातील सत्तेतून बाहेर पडल्यानंतरच काँग्रेस शिवसेनेशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी दिल्लीत झालेल्या भेटीत सोनिया गांधींची पवारांसमोर ही भूमिका मांडल्यांचं कळतंय. त्यामुळे पवारांची सोनियांशी चर्चा सुरूच राहणार आहे.