मुंबई : मागील काही महिन्यांपासून सातत्यानं फोफावणारा coronavirus कोरोना व्हायरस आता मात्र कमी तीव्रतेच्या टप्प्यात जात असल्याचं निरिक्षणातून पाहायला मिळत आहे. मुळात याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण कोरोना रुग्णांच्या नव्या आकडेवारीचा अहवाल पाहता काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होत आहेत. त्यातच मायानगरी मुंबईला मोठा दिलासा मिळत असल्याचंही दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसचा अतिशय वेगानं फैलाव होत असणाऱ्या Mumbai मुंबई शहराची कोरोनाशी सुरु असणारी झुंज बऱ्याच अंशी यशस्वी ठरताना दिसत आहे. मुख्य म्हणजे गणेशोत्सव आणि दरम्यानच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये कोरोना संसर्गानं पुन्हा एकदा संकटाची छाया गडद केली होती. पण, आता मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा पराभव होताना दिसत आहे. 


नव्यानं समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 132 दिवसांवर पोहोचला आहे. शहातील 24 विभागांपैकी 23 विभागातही हा कालावधी 100 दिवसांच्या वर आहे. फक्त आर दक्षिण या विभागातच रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी शंभरपेक्षा कमी म्हणजेच 97 दिवसांवर आहे.


 




 


 


मुंबईच्या एफ दक्षिण विभागाची यादरम्यान लक्षणीय कामगिरी पाहायला मिळत आहे. या विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 256 दिवसांवर पोहोचला आहे. या विभागात रूग्ण वाढीचा सरासरी दरही 0.27% असा मुंबईतील सर्वात कमी दर ठरत आहे. परिणामी ही आकडेवारी बऱ्याच अंशी दिलासा देऊन जात आहे. असं असलं तरीही नागरिकांनी गाफील न राहता हा लढा असाच सुरु ठेवत कोरोनाला नमवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.