अंबानी धमकी प्रकरणी मोठा खुलासा, पोलिसाच्या मुलाने पाठवला होता ई-मेल; पाकिस्तान क्रिकेट कनेक्शनही उघड
उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या राजवीरने मुकेश अंबानी यांना धमकीचे एकूण 5 ई-मेल पाठवले होते.
उद्योगपती मुकेश अंबानी यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे ई-मेल पाठवत खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, यामधील एक आरोपी राजवीर हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय राजवीरने पाकिस्तानी क्रिकेटर शादाब खानच्या नावे ई-मेल आयडी तयार केला होता.
शनिवारी गांधीनगरच्या कलोल परिसरातून राजवीर याला अटक करण्यात आली. तो गुजरात पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. त्याने 27 ऑक्टोबरला सर्वात पहिला ई-मेल पाठवला होता. यामध्ये त्याने मुकेश अंबानींकडे 20 कोटी रुपये द्या, अन्यथा तुम्हाला जीवे मारुन टाकेन अशी धमकी दिली होती
shadabkhan@mailfence या नावाने त्याने बनावट ई-मेल आयडी तयार केला होता. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेत सामना सुरु असताना त्याने हा ई-मेल आयडी तयार केला. या सामन्यात शादाब खानने फलंदाजी करताना 46 धावा केल्या होत्या. राजवीर याने पोलिसांना आपल्याला नेमकी ही कल्पना कशी सुचली हेदेखील सांगितलं. सामना पाहत असतानाच आपल्याला शादाब खानच्या नावे ई-मेल आयडी तयार करण्याचं डोक्यात आलं असं तो म्हणाला आहे.
राजवीरने डार्क वेबचा घेतला आढावा
पोलिसांनी सांगितले की, राजवीरने डार्क वेबवर फार वेळ घालवला आणि त्याला कळले की मेलफेन्स नावाच्या ईमेल प्रदाता कंपनीचा सर्व्हर बेल्जियममध्ये आहे आणि ही फर्म आपल्या ईमेल वापरकर्त्यांची माहिती कोणाशीही शेअर करत नाही. राजवीरने आपलं ठिकाण लपवण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर केला होता.
क्राइम ब्रांचने तपास केला असता ज्यादिवशी धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला त्यादिवशी देशातील एकूण 150 लोक मेलफेन्सचा वापर करत होते असं आढललं. यानंतर सर्वांची छाननी केली असता पोलीस गांधीनगरपर्यंत पोहोचले.
दुसऱ्या आरोपीला क्राइम ब्रांचकडे सोपवलं
राजवीर बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. त्याने मुकेश अंबानींना धमकीचे एकूण 5 ई-मेल्स पाठवले. पहिल्या मेलमध्ये त्याने 20 कोटी, दुसऱ्यात 200 आणि नंतर 400 कोटींची मागणी केली.
दुसरा आरोपी, 19 वर्षीय गणेश रमेश वनपर्धी हा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. त्याला अंबानींना जीवे मारण्याची धमकी देऊन 500 कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तेलंगणातील वारंगल येथून अटक करून त्याला गावदेवी पोलिसांनी गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वनपर्धीने अंबानींना 400 कोटींची खंडणी मागण्याची धमकी मिळाल्याची बातमी एका वाहिनीवर पाहिली तेव्हा त्याने 500 कोटींची मागणी करणारा ईमेल (जीमेल वापरून) पाठवला. अटक केलेले दोन्ही आरोपी 8 नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत.