मुंबई : समविचारी आणि समकालीन कलाकारांनी एकत्र येऊन चित्रं करून आणि त्यातून होणाऱ्या विचारमंथनाने प्रत्येक कलाकाराला कलेची पुढची दिशा ठरवण्यास मदत होईल त्यातून निर्माण झालेल काम वर्षातून एकदा प्रदर्शित करण्याचा 'तुर्या' समूहाचा हेतू आहे. एकट्याने कलासाधना करण्यापेक्षा एकत्र येऊन केलेल्या कामाने सर्व कलाकारांचा उत्कर्ष आणि पर्यायाने समाजाचा उत्कर्ष होईल यावर ग्रुपचा ठाम विश्वास आहे. यासाठी महिन्यातून एकदा एकत्र भेटणे, चर्चा करणे, चित्रं काढणे, एकत्र एखाद्या प्रदर्शनाला भेट देणे आणि प्रत्येकाला आपापली मत व्यक्त करायला लावणे, कलेच्या अभ्यासासाठी वर्षातून एकदा आर्ट हेरिटेज टूरला जाणे. ग्रामीण भागात कलेचा प्रसार व्हावा म्हणून तिथे कार्यशाळा आयोजित करणे असे उपक्रम समूहातर्फे चालवले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


याचाच परिपाक म्हणजे गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये कोकणातल्या निसर्गाच्या कुशीत 'दृष्यभाषा' ही खास कलाविद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली तीन दिवसीय कार्यशाळा पार पडली. विद्यार्थ्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.
आता तुर्या समूहातल्या १० कलाकारांचं एक समूह प्रदर्शन येत्या १४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत फोर्ट मधल्या 'आर्टिस्ट्स सेंटर आर्ट गॅलरीत' सुरू होतंय. भूषण वैद्य, योगेश पाटील, उमेश पाटील, गणेश अपराज, सतेंद्र म्हात्रे, राजभर राजेश, रोहित भानुशाली, शिवाजी पाटील, प्रशांत धाडवे, रितेश भोई आदी दहा कलाकारांची चित्रं आणि शिल्पं आपल्याला तिथे पहायला मिळतील.



 


कलावंताच्या चित्रप्रक्रियेत त्याच्या दृश्याविषयीच्या जाणीवा रंगांद्वारे आकाराच्या भाषेने तर कधी आकाराद्वारे रेषेच्या दर्शनाने समृद्ध होतात. आकार आणि अवकाशाच्या संयोजनाने कलावंत आपला चित्रावकाश व्यापून परीपूर्ण करतो , हीच समृद्ध झालेली दृष्यजाणीव  कलावंताची चित्रभाषा बनते. याच 'चित्रभाषेच्या माध्यमातून मिळणारी चित्रानुभूती ही चित्रातील दर्शन प्रक्रियेला रसिकांसमोर खुली करणारी असावी' असा तुर्यातील सहभागी कलावंताचा प्रयत्न आहे. या करता कलावंताला आपल्या दृश्यविचारांची जाणीव असणं गरजेचं आहे कारण इथेच कलावंताच्या 'तुर्या' अवस्थेचा खरा कस लागतो. तुर्या ही समाधीतली एक अवस्था आहे जीचा अर्थ समरस होणं, एकरूप होणं, निर्विकार होणं. म्हणूनच या समूहाला 'तुर्या' हे नाव दिलं गेलं. हे प्रदर्शन 'तुर्या' समूहाचे पहिले सामूहिक प्रदर्शन असून या प्रदर्शनाद्वारे एकाच समूहातील कलावंतांच्या दृश्यजाणिवेतील विविधता मांडण्याचा प्रयत्न आपल्याला या प्रदर्शनातून पाहायला मिळेल.


कुठे पाहता येणार हे प्रदर्शन


आर्टिस्ट्स सेंटर आर्ट गॅलरी


अडोर हाऊस, ६ के दुभाष मार्ग,


कालाघोडा, मुंबई - ४०० ००१


वेळ :


सकाळी ११ ते सायंकाळी ७