डिजिटल अटक करण्याच्या हेतूने आलेल्या व्हिडीओ कॉलला मुंबईकर तरुणाने आपल्या श्वानाचा वापर करत चांगलाच धडा शिकवला. आर्थिक फसवणूक करण्याच्या हेतूने बनावट पोलीस अधिकाऱ्याने व्हिडीओ कॉल केला असता, तरुणाने आपल्या श्वानालाच कॅमेऱ्यासमोर बसवलं. तरुणाने हा व्हिडीओ इंस्टाग्रामला शेअर केला आहे. व्हिडीओत तरुणाच्या मोबाईलवर एक व्यक्ती आपण अंधेरी पूर्व पोलीस ठाण्यातून बोलत आहोत सांगत अधिकारी असल्याचा बनाव करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओच्या सुरुवातीला पोलीस अधिकारी सांगतो की, "मी अंधेरी पूर्व पोलीस ठाण्यातून बोलत आहे". यानंतर तो तरुणाला त्याचा चेहरा दाखवण्यास सांगतो. पण तरुण चेहरा दाखवण्याची मागणी पूर्ण करण्याऐवजी थेट आपल्या श्वानाला उचलचो आणि कॅमेऱ्यासमोर बसवतो. "हे घ्या सर, आलो मी समोर", असं तो उपहासात्मकपणे व्हिडीओ कॉलमध्ये सांगतो. यावेळी तो श्वानाला कॅमेऱ्याच्या अगदी जवळ नेतो.



यावेळी बनावट पोलीस अधिकारीही आश्चर्यचकित होतो. त्याला असं काही होईल याची अजिबात अपेक्षा नसतो. यानंतर तो हसतो आणि कॅमेरा अँगल बदलत फोन कट करतो. 'अरे हा पाहा मी. अर ठाणेदार दिसतोय का? अरे खोटी वर्दी,' असं म्हणत तरुण हसत राहतो. यावेळी चिडलेला आणि पकडले गेलो आहोत ही जाणीव झालेला पोलीस अधिकारी फोन बंद करतो. "मुंबई पोलीस असल्याचा बनाव, स्कॅम कॉल पकडला गेला," अशी कॅप्शन त्याने व्हिडीओला दिली आहे.


काय आहे डिजिटल अरेस्ट?


डिजिटल अटक ही एका प्रकारची फसवणूक आहे. यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी असल्याची बतावणी करून, खोट्या ऑनलाइन तपासाच्या किंवा अटकेच्या धमकीखाली पीडितांना पैसे देण्यास भाग पाडलं जातं. भय आणि दहशतीची भावना निर्माण झाल्याने अनेकजण याला बळी पडतात. 


काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका जपानी व्यक्तीला मुंबई पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी 35.5 लाख रुपयांचा गंडा घातला होता. घोटाळेबाजाने त्याच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात गुंतल्याचा खोटा आरोप केला आणि त्याला "डिजिटल अरेस्ट" केली. आरोपींनी त्याला त्याला विविध माध्यमांद्वारे पैसे देण्यास भाग पाडलं.