मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाच्या संघर्षामुळे राज्यातील सत्तास्थापनेबाबत अजूनही अस्पष्ट वातावरण आहे. मात्र, सोमवारी रात्री ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स झळकले. 'साहेब आपण करून दाखवलंत', अशा मथळ्याखाली लावण्यात या पोस्टर्सवर आदित्य ठाकरे यांचा उल्लेख 'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री' असा करण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक हाजी हलीम खान यांनी हे पोस्टर्स मातोश्रीबाहेर लावल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळेलच, याची शिवसैनिकांना इतकी खात्री का आहे, अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीनंतरही राज्यातील सत्तास्थापनेबाबत काहीच तोडगा निघू शकला नव्हता. यानंतर दिल्लीत शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. मात्र, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार का, याचा निर्णय अजून झाला नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 


तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे पुन्हा ठणकावून सांगितले होते. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण द्यावे. त्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यास शिवसेना सरकार स्थापन करेल, असेही राऊत यांनी म्हटले होते.



दरम्यान, भाजप शिवसेनेला महसूल आणि अर्थ खाते देण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. परंतु, शिवसेनेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद देण्यास अमित शहा यांनी ठाम विरोध दर्शविला आहे. तसेच शिवसेनेशी चर्चा करण्याचे अधिकार त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच दिल्याचे सांगितले जाते.