जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणारा RPF जवान चेतन सिंहबाबत मोठा निर्णय
जयपूर-मुंबई सेंट्र्ल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये (Jaipur-Mumbai Central superfast express) गोळीबार करत आपला वरिष्ठ अधिकारी आणि तीन प्रवाशांची हत्या करणाऱ्या चेतन सिंहची (Chetan Singh) मानसिक स्थिती तपासली जाणार आहे. पोलिसांनी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, अटक केली होती.
रेल्वे सुरक्षा दलाचा जवान चेतन सिंह (Chetan Singh) याने जयपूर-मुंबई सेंट्र्ल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये (Jaipur-Mumbai Central superfast express) आपला वरिष्ठ अधिकारी आणि तीन प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वरिष्ठांशी झालेला वाद आणि तणाव यातूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार केल्यानंतर तो ट्रेनमधील प्रवाशांशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरपीएफने चेतन सिंहला मानसिक आरोग्य तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आरपीएफने या घटनेत कोणताही जातीय संदर्भ नाकारला आहे.
रेल्वे पोलीस कर्मचारी चेतन सिंह याने आपल्या एका वरिष्ठ अधिकारी आणि तीन प्रवाशांची जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळ्या घालून हत्या केली. यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपीएफ जवानाचे 'सर्वसमावेशक मानसिक आणि मानसिक आरोग्य मूल्यांकन' केलं जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून या घटनेला जातीय रंग दिला जात असून, रेल्वे मंत्रालयाने तो नाकराला आहे. आरोपीने आपल्या हिंदू वरिष्ठ अधिकाऱ्याचीही गोळ्या घालून हत्या केल्याचं त्यांना निदर्शनास आणून दिलं आहे.
ट्रेनमध्ये नेमकं काय झालं?
सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना, कॉन्स्टेबल नरेंद्र परमार, घनश्याम आचार्य आणि चेतन सिंह यांनी पहाटे 2 वाजून 53 मिनिटांनी मुंबईकडे जाणारी ट्रेन पकडली. टीकाराम मीना आणि चेतन हे एसी कंपार्टमेंटमध्ये तैनात होते तर घनश्याम आणि परमार हे स्लीपर कोचमध्ये कर्तव्यास होते.
ट्रेनमध्ये चढल्यानंतर अर्ध्या तासाने चेतनला बरं वाटू लागलं नव्हतं. चेतनला पुढील स्थानकावर उतरायचं होतं. पण मीना हे त्याला शिफ्ट संपण्यासाठी अजून दोन तास शिल्लक असल्याचं सांगत होते. कंट्रोल रुममधील अधिकाऱ्यांनीही चेतनला आपले कामाचे तास पूर्ण कर आणि नंतर मुंबईत उपचार घे असं सांगितलं. यामुळे तो चिडला आणि भांडू लागला. यानंतर त्याने आपल्या एका सहकाऱ्याचा गळा दाबवण्याचाही प्रयत्न केला. यानंतर त्याने गोळीबार करत सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना आणि तीन प्रवाशांची हत्या केली.
रेल्वे मंत्रालयाने वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आपण या घटनेची अत्यंत सविस्तपणे चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे चेतनच्या कुटुंबाने तो फार गरम डोक्याचा असल्याचं सांगितलं आहे. तसंच वेस्टर्न रेल्वेने आपण या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. चेतन सिंह लोअर पऱळ येथे कर्तव्यासाठी तैनात होता अशी माहिती त्यांनी दिली.