मुंबई : आधार कार्ड वेगवेगळ्या खात्यांची लिंक करण्याची सध्या धावपळ सगळीकडे बघायला मिळते आहे. त्यासाठी सरकारकडून डेडलाईनही देण्यात आली आहे. सिम कार्ड, बॅंक खाते आणि पोस्ट खात्यांसोबत आधार कार्ड लिंक करायचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. पण यात फसवेगिरीही होत असल्याचे समोर आले आहे. आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात जर तुम्हाला फोन येत असेल तर वेळीच सावध व्हा! नाही तर तुमच्या अकाऊंटमधील रक्कम साफ झाली म्हणून समजा. 


फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वॄत्तानुसार, मुंबईतील शाश्वत गुप्ता या तरूणाला नुकताच आधार लिंक संदर्भात आलेल्या फोनमुळे लाखोंचा गंडा घालण्यात आलाय. शाश्वत गुप्ता हा तरूण ‘कोझीकोड’ या फर्ममध्ये नोकरी करतो. आधार कार्ड आणि फोन नंबर जोडून देतो, यासंदर्भात त्याला एक फोन आला होता. पण त्या फोन करणा-या भामट्याने शाश्वतच्या अकाऊंटमधून तब्बल १ लाख ३० हजार रूपये लंपास केले. या संदर्भात शाश्वत गुप्ताने एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.


शाश्वतने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझं सॅलरी अकाऊंट लुटलं गेलंय. मला एक फोन आला, या माणसाने एअरटेल कंपनीचा एजंट असल्याचे सांगितले. त्याने मला तुमचा मोबाईल आणि सिमकार्ड आधारसोबत लिंक केले नसल्याने कायमचे ब्लॉक झाल्याचे सांगितले. नंबर रिअॅक्टिव्हेट करायचा असेल तर एअरटेलचा कस्टमर केअर नंबर १२१ वर एक मेसेज पाठवण्यास सांगितले. मी १ लाख ३० हजार रूपये जमा करून ठेवले होते. मात्र ते आता चोरीला गेले’, असे शाश्वतने म्हटले आहे.



या सगळ्या प्रकाराबाबत शाश्वतने तातडीने आयसीआयसीआय बँकेत तक्रार दिली आहे. शाश्वतची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. शाश्वतने त्याची पोस्ट आयसीआयसीआय बँक, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, रविशंकर प्रसाद, पियूष गोयल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरबीआय या सगळ्यांना टॅगही केली आहे.