मुंबई : मुंबईतल्या आरेमध्ये 'मेट्रो ३' साठीच्या कारशेडकरता मध्यरात्रीच वृक्षतोड करण्यात आली. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पर्यावरणप्रेमींपर्यंत पोहोचल्यानंतर आरे परिसरात त्यांनी धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र तात्काळ वनराई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. शनिवारी आरेमध्ये जाणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आलेत. 


आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. त्यानंतर वृक्षतोडसंदर्भात प्राधिकरणानं घेतलेला निर्णयाची अंमलबजावणी, मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सरंक्षणात सुरू केली. या परिसरात जवळपास ४०० ते ५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बसच्या मार्गातही बदल करण्यात आलेत. तसंच आरेच्या परिसरात १४४ कलम (जमावबंदी) लागू करण्यात आलंय.