Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर आरोपी मॉरिस नोरोन्हाने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी याचे राजकारण करु नये असं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर दहिसरसह मुंबईत खळबळ उडाली आहे. दहिसरमधल्या नागरिकांना आणि शिवसैनिकांना जबर धक्का बसला आहे. यासोबत गीतकार अवधूत गुप्ते यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत. अत्यंत मृदू स्वभावाचे अभिषेक हे कायमच एक मनमिळावू आणि हसरे व्यक्तिमत्व होते असे अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.


काय म्हटलं अवधूत गुप्तेंनी?


"दहिसरचे माजी नगरसेवक आणि लाडके नेतृत्व श्री अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा प्रत्येक दहिसर-बोरिवलीकर नागरिकांसाठी जितका धक्कादायक आणि दुःखद आहे तितकाच तो माझ्यासाठी देखील आहे! अत्यंत मृदू स्वभावाचे अभिषेक हे कायमच एक मनमिळावू आणि हसरे व्यक्तिमत्व होते. ते कायम लोकांच्या अडीअडचणींना मदतीसाठी धावून जात असत. कोरोना काळामध्ये आमच्या 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाच्या चित्रिकरणादरम्यान दररोज सेटवर दोन-चार लोक कोव्हिड पॉझिटिव्ह येत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड माळवून देण्यापासून ते ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्यापर्यंत अभिषेक प्रचंड मदत करत. माझ्या आईच्या आजारपणात तर त्यांनी मोठ्या भावासारखी मदत केली! अर्थात, त्यांना हा संस्कारांचा वारसा मिळाला तो त्यांच्या वडिलांकडून, म्हणजेच आमचे ज्येष्ठ स्नेही मा. श्री. विनोदजी घोसाळकर यांच्याकडून. विनोदजींच्या दुःखाची मी कल्पनाच करू शकत नाही! दुःखाचा हा डोंगर पार करण्यासाठी आणि आपल्या सोबतच आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी लागणारी संपूर्ण शक्ती आई एकविरा त्यांना देवो! अभिषेकजिंच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे, तर आम्हा समस्त दहिसर-बोरवलीकरांचे फार मोठे नुकसान झाले आहे! ईश्वर अभिषेकजिंच्या आत्म्यास शांती देवो! ॐ शांती!!, असे अवधूत गुप्ते यांनी म्हटलं आहे.



अभिनेत्री अनघा अतुलने व्यक्त केला रोष


या सगळ्या प्रकारानंतर मराठी अभिनेत्री अनघा अतुलने सोशल मीडियावर रोष व्यक्त केला आहे. अनघा अतुलने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये घटलेल्या घटनेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. "आपल्या आजूबाजूला हे काय घडतंय? अशा बातम्या मला खूप अस्वस्थ करतात. आपण किती दुर्लक्ष करतोय?," असे अनघा अतुलने म्हटलं आहे.