मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई महानगरपालिकेतल्या फुटून गेलेल्या सहा नगरसेवकांसह, पक्षात राहिलेल्या एकमेव नगरसेवकाला व्हीप जारी केला आहे. फुटीर नगरसेवकांना जेरीस आणण्यासाठीच मनसेनं व्हीपची ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


ते नगरसेवक अपात्र ठरणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत महापालिका सभागृह तसंच समिती बैठकांमध्ये मतदान करु नये असा व्हीप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जारी केला आहे. व्हीपचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही मनसेनं दिलाय. मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेले नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या अजून मनसेचेच आहेत. त्यामुळेच त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार असल्याचा दावा मनसेनं केलाय. नगरसेवकांचं पक्षांतर बेकायदेशीर असल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात यावं अशा मागणीची याचिका, याआधीच मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. 


पैशांची देवाण-घेवाण?


दरम्यान मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या दोन नगरसेवकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं कारवाईला सुरुवात केली आहे. मनसे नगरसेवकांना दिलेल्या ऑफरमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचा एसीबीचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे त्या दोन नगरसेवकांवर कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती एसीबी सूत्रांनी दिलीय. तर इतर चार नगरसेवकांच्या गुप्त चौकशीत विशेष काही आढळलं नसून, गरज पडल्यास त्यांचीही उघड चौकशी केली जाईल असंही एसीबीनं स्पष्ट केलंय.