दीपक भातुसे, मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची गच्छंती अटळ दिसते आहे. विद्यापीठाचे सर्व निकाल लागल्यानंतर देशमुखांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील गोंधळावरून राज्यपाल कुलगुरूंवर प्रचंड नाराज असल्याचं समजतंय. कारवाई करण्यासाठी सरकारवरही विविध स्तरातून दबाव येत आहे. ऑनलाईन पेपर तपासणीमुळे विद्यापीठाचे तब्बल ४७७ परीक्षांपैकी केवळ ५१ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. ४२६ परीक्षांचे निकाल जाहीर होणे बाकी आहे. कुलगुरूंनी सरकारला न विचारता ऑनलाईन पेपर तपासणीचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं आता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ लागलंय. विद्यापीठानं आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आजपासून सलग चार दिवस सुटी दिली गेली आहे. प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन तपासणीतल्या घोळामुळे आता चार दिवस मुंबई विद्यापीठाच्या सर्वच कॉलेजमध्ये ही अध्ययन सुटी देण्यात आली आहे. 


३१ जुलैपुर्वी गेल्यावर्षीचे निकाल जाहीर करा असा आदेश राज्यपालांनी काढला होता. विद्यापीठात दरवर्षी १८ लाख उत्तरपत्रिका तपासल्या जातात. आता 31 जुलैच्या आत जर निकाल लावायचे असतील, तर दिवसाला 60 हजार उत्तरपत्रिका तपासून पूर्ण करव्या लागणार आहेत. त्यामुळे आता प्राध्यपकांना त्यांचं शिकवण्याचं काम सोडून तपासणीच्या कामाला जुंपण्यात आलं आहे.


शिक्षणमंत्री आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांचे राजीनामे घ्या अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.