मुंबई : गावी जाताना मेल-एक्स्प्रेसमध्ये कन्फर्म तिकीट मिळावे, यासाठी दलाल प्रवाशांकडून जादा पैसे घेतात. या लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दलालांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. जानेवारी 2018 ते मार्च 2019 पर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने एकूण 285 दलालांना पकडले आहे. या दलालांकडून 2 लाख 36 हजार 500 रुपयेयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने अशा दलालांची तक्रार करण्याकरिता प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. 


अनधिकृत दलाल तिकीट खिडक्यांसमोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. तात्काळ तिकीट मिळविण्यासाठी अनधिकृत दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यामुळे तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांना तिकिटाची विक्री करण्यासाठी दलाल तिकीट घरासमोर असतात. इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांकडून या दलालांचा आधारावर  तिकीट घ्यावे लागतात. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने कंबर कसली आहे. 


दलालांकडून  714 रेल्वे तिकीटे जप्त


तसेच यावर्षी  रेल्वे सुरक्षा दलाने जानेवारी ते मार्च  2019 पर्यंत 52 तिकीट दलाला पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दलालांकडून  714 रेल्वे तिकीटे जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर 35 हजार रुपयाच्या दंड ठोठावला आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून दिलेल्या माहिती नुसार 2018 मध्ये 213 दलाला विरोधात तक्रारी आल्या होत्या. तेव्हा रेल्वे पोलिसांनी 233 रेल्वे तिकीट दलाला पकडून त्यांच्याकडून 10 हजार 220 तिकिटे जप्त  केली आहेत. 


तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक


तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाकडून रेल्वेच्या तिकीट दलालांची तक्रार करण्याकरिता प्रवाशांसाठी  9987645307 या  हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर दलालाचा फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही पाठवू शकतात. या व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.