मुंबई : भाजपा प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचा स्थापना सोहळा रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत पार पडला. शिवसेनेतून भाजपामध्ये आलेल्या हाजी अराफत शेख यांच्या पुढाकारानं भाजपच्या या वाहतूक संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांनी यावेळी नितीन गडकरींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्षपदी ईशा कोप्पीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर ईशा कोप्पीकरला भाजपच्या रस्ते वाहतूक सुरक्षेची ब्रॅण्ड ऍम्बेसेडरही बनवण्यात आली आहे.


कोण आहेत हाजी अराफत शेख?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाजी अराफत शेख यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपतर्फे त्यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेत असताना हाजी अराफत शेख महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष होते.


स्वप्न दाखवणारे नेते सगळ्यांना चांगले वाटतात, पण स्वप्न पूर्ण झाली नाहीत तर लोकं पिटून काढतात, असं वक्तव्य गडकरींनी या कार्यक्रमात केलं. मी स्वप्न दाखवणारा नेता नाही. जे बोलतो ते 'डंके की चोट पर' बोलतो, असं गडकरी म्हणाले. जगातील सर्वाधिक अपघात भारतात होतात. भारतातली ३० टक्के लायसन्स बोगस आहेत, अशी कबुली गडकरींनी दिली. २० नद्यांचं जलमार्गात रुपांतर करत असल्याचं गडकरींनी सांगितलं. तसंच संघटनेला ताकदवान बनवा आणि शक्तीशाली बनवा असा सल्ला गडकरींनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.