अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मुंबईतून निवडणूक लढवणार?
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लोकसभा निवडणूक लढवणार?
दीपक भातुसे, मुंबई : उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून 'रंगीला' गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी भाजपचे तगडे उमेदवार असून त्यांच्याविरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याची काँग्रेसचा प्रयत्न आहे. २०१४ साली उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर निरुपम इथून निवडणूक लढवण्यास तयार नसून त्यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम नाईक यांचा अभिनेते गोविंदा यांनी पराभव केला होता. हा इतिहास लक्षात घेता.
ग्लॅमरस चेहरा दिला तर उत्तर मुंबईत चमत्कार होऊ शकतो अशी आशा काँग्रेसला आहे. उत्तर मुंबईतून अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र ऊर्मिला मातोंडकर यांचे नाव पुढे आले आहे. येत्या दोन तीन दिवसात मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये होणार प्रवेश होण्याची शक्यता असून त्यांची अधिकृत उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.