मुंबई: युवासेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव अचानकपणे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केले जाऊ लागल्याने शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. एवढेच नव्हे तर आगामी काळात शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळाल्यास आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, असा सूर पक्षातील काहीजणांनी लावला आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेते अस्वस्थ झाल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस गुरुवारी पार पडला. यानिमित्ताने शिवसेनेचे अनेक नेते मातोश्रीवर आले होते. यावेळी युवासेनेने पुन्हा एकदा आदित्य यांचे नाव उचलून धरले. आदित्य यांनी विधानसभा निवडणूक लढवावीच पण राज्याचे नेतृत्त्वही करावे, यासाठी युवासेनेतून दबाव आणला जात आहे. आदित्य ठाकरे जर राज्याचे मुख्यमंञी झाले तर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचेही साहजिकच पक्षात महत्त्व वाढणार आहे. या सगळ्यामुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. अडीच वर्षांसाठी मुख्यमंञीपद मिळणार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. अर्थात कुणीही हे थेट बोलायला तयार नाही. 


प्रखर हिंदुत्वाची भाषा बाळासाहेबांनी वापरली, उध्दव ठाकरेंनीही वापरली. पण आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत तरी कधीच जहाल आणि प्रखर हिंदुत्वाची भाषा केली नाही. त्यामुळे पक्षात परिवर्तनाची लाट तर येणार नाही ना, याची कुजबूज शिवसेनेच्या ज्येष्ठांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे वरळी, माहिम किंवा शिवडीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी आणि माहिम विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची दादरच्या सेनाभवनात बैठक घेतली होती. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडण्याची तयारी आमदार सुनिल शिंदे याआधीच दर्शवली आहे.