मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर (BMC) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस गटला ओपन चॅलेंज दिलं. तिकडे मोर्चा सुरु असताना इकडे आदित्य ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेले राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित कनाल यांनी शिंदे गटात प्रवेश केला. राहुल कनाला हे युवासेना कार्यकारिणी सदस्य होते. तसंच आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू समजले जात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल कनाल यांची प्रतिक्रिया
यावेळी राहुल कनाल यांनी आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेशका केला याचं स्पष्टीकरण दिलं. कोव्हिड काळात ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजसेवा केली. त्याच पद्धतीने आम्ही कोविड काळात फक्त सेवा केली. मेव्याशी आमचा काहीही संबंध नव्हता असं राहुल कनाल यांनी म्हटलंय. सुशांतसिंग राजूपत किंवा दिशा सालियन प्रकरणात आपल्यावर आरोप झाला. पण या प्रकरणाचा तपास सुरु करा आणि यात दोषी आढळलो तर तुमची चप्पल आणि माझं डोकं असेल असं राहुल कनाल यांनी यावेळी सांगितलं. 


म्हणून लोकं प्रवेश करतात - शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल कनाल यांना शाल आणि पक्षाचा झेंडा देत राहुल कनाल यांचं शिवसेनेत स्वागत केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन होऊन 30 जूनला एक वर्ष झालं. गेले वर्षभर अनेक उपक्रम, कार्यक्रम, निर्णय योजना या सरकारने राबवल्या. सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय आपण घेतले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत दररोज मोठ्याप्रमावर प्रवेश होत आहे. आम्ही या सर्वांचं स्वागत करतो. इथे कामाला संधी आहे. आम्ही काम करतो, आणि काम करणारे आम्हाला आवडतात, असं शिंदे यांनी यावेळी  सांगितलं.


राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे. यावर बोलताना शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. कोविड काळात राहुल कनाल यांनी केलेलं काम मोठं आहे. स्व:खर्चाने त्यांनी जीवाची पर्वा न करता लोकांची मदत केली. दुसऱ्यांना मदत करतात त्यांना लोकं लक्षात ठेवतात. कोणत्या नेत्यामुळे तुमची ओळख नाही तर तुमच्या कामामुळे तुम्ही ओळख निर्माण केली आहे, अस मुख्यमंत्री शिंदे म्हणाले


समृद्धी महामार्ग अपघातात 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे शिवसेना-भाजपाचा आजचा मोर्चा आम्ही रद्द केला, पण काही लोकांना केवळ राजकारण करायचंय त्यामुळे त्यांनी मोर्चा काढला. खरं तर हा मोर्चा मातोश्रीवर निघायला हवा होता, कारण सर्व तिकडेच घडलंय. हा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. बोगस डॉक्टर, बोगस कोविड सेंटर, बोगस बॅग. डेडबॉडी बॅग 600 रुपयांची बॅग साडेसहा हजार रुपयांना विकत घेतली असा आरोपकरत ठाण्यात आम्ही 325 रुपयांना विकत घेतली. तुम्ही बिनधास्त इन्क्वारी लावा असं आव्हानही शिंदे यानी दिलं.