Omicron चा धोका! राज्यात लवकरच नवे निर्बंध? काय म्हणाले आदित्य ठाकरे
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे
मुंबई : देशासह महाराष्ट्रात (Maharashtra) ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढू लागला आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 21 रुग्ण सापडले असून त्यापैकी 8 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या 6 जणांना तर पुणे इथं एकाला आणि मुंबईतल्या धारावी इथल्या एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे, पण घाबरण्याची गरज नाही, खबरदारी घ्या असं आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. राज्यात नविन नियमावली लावणार का? याबाबत बोलताना राज्यात पुढच्या दोन-तीन दिवसात परिस्थिती पाहून गाईडलाईन कठोर करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तसंच सध्या लग्न समारंभांवरही कोणतेही निर्बंध नाहीत, मात्र कोरोनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेची जय्यत तयारी
ओमायक्रॉनबाबत मुंबई महापालिकेने (Mubai Municipla Corporation) जय्यत तयारी ठेवली आहे. मुंबईत 30 हजार राखीव बेड तयार ठेवण्यात आलेत. मुलांना असलेला धोका लक्षात घेता 1500 बेड लहान मुलांसाठी तयार केलेत. लहान मुलांसाठी विशेष ऑक्सिजन मास्क, व्हेंटीलेटर यांचीही तयारीही करण्यात आली आहे.
जोखीम असलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांचं टेस्टींग होत आहे. महापालिकेने विनामूल्य सेवेसाठी कोविड सेंटर राखून ठेवलेत. मुंबईतल्या 19 संशयितांचे जिनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल उद्यापर्यंत येतील असं अतिरिक्त आयुक्त सुरेस काकाणी यांनी म्हटलं आहे.
मुंबईत ओमायक्रॉनचा रुग्ण नाही
मुंबईत ओमायक्रॉनचा अजूनही रूग्ण नसल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी (Kishori Pednekar) म्हटलं आहे. पण प्रादूर्भाव वाढू नये म्हणून महानगर पालिका सतर्क असल्याचंही त्यानी सांगितलं. जे मास्क वापरत नाहीत त्यांच्यासाठी मार्शलांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी नियम पाळा आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.