Gunratne Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, पाहा न्यायालयात कसा रंगला युक्तीवाद
सरकारी वकिलांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या घरावर एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी (ST Strike) हल्ला केला, याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना किला कोर्टात उभं केलं असताना न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची म्हणजे 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 109 कामगारांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना आज मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याआधी कोर्टात घेऊन जात असताना सदावर्ते यांनी लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, माझ्या हत्येचा कट रचला जात आहे असा आरोप केला.
न्यायमूर्ती के जी सावंत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सदावर्ते यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी आणि वकील जयश्री पाटील, महेश वासवानी, घनश्याम उपाध्याय यांनी बाजू मांडली. तर अॅड. प्रदीप घरत हे सरकारी बाजू मांडली.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद
राज्य सरकारकडून ऍड. प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. आरोपींवर 142, 143, 147, 149, 345, 332, 33, 120 b या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे, पुढील तपासासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. गुप्तवार्ता विभागाने याबद्दल माहिती दिली होती. मीडियाशी बोलताना सदावर्ते यांनी शरद पवार यांच्या घरात घुसून जाब विचारू असे वक्तव्य केलं होतं.
आमच्या गुप्तवार्ता विभागाला याबाबत माहिती मिळाली होती. हाय कोर्टने दिलेला निर्णय हा आमच्या बाजूचा आहे असा दावा सदावर्ते यांनी केला होता. सदावर्ते यांनी ST कर्मचाऱ्यांसमोर आझाद मैदानात भाषण करत त्यांना भडकावलं, शरद पवार यांच्या घरावर मोर्चा न्यावा अशा पद्धतीने सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना चिथावलं असा दावा सरकारी वकिलांनी केला.
शरद पवार, अजित पवार, अनिल परब यांची नाव घेऊन कर्मचाऱ्यांसमोर चिथावणीखोर वक्तव्य केलं, तसंच कालच्या हल्ल्यात संपत्तीचे नुकसान केलेले CCTV मध्ये दिसत आहे, पोलीसांना तपास करायचा आहे, असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला.
22 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हायचे आदेश हाय कोर्टने दिले होते, मात्र त्याची वाट न पाहता सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांना भडकावलं, या प्रकरणात कोण कोण पडद्यामागे आहेत याचा तपास होणं गरजेचं आहे, या प्रकरणात एकटे सदावर्ते नाहीत या घटनेमागे मोठी शक्ती आहे असं सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांचा युक्तीवाद
गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने अॅड महेश वासवाणी यांनी बाजू मांडली. ST कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखे वागवले जात नव्हतं, 124 आत्महत्या झाल्या, त्यानंतर एकही नेत्याने जाऊन त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली नाही, असा दावा अॅड महेश वासवाणी यांनी केला.
सदावर्ते यांनी बारामती यांच्या घराबाहेर आंदोलन करा म्हणाले, मुंबईतील घरात घुसून नाही, घरात घुसून हे शब्द राज्य सरकार घुसवत आहे, असा युक्तीवाद अॅड महेश वासवाणी यांनी केला.
मैदानात जय श्रीराम आणि रघुपती राघव अशी भजन म्हटली जात होती, जय श्रीरामाच्या घोषणेमुळे त्यांच्या मागे कोणती शक्ती असावी अशी धारणा राज्य सरकारची झाली असावी असं अॅड महेश वासवाणी यांनी म्हटलं.
सदावर्ते तपासात सहकार्य करण्यास तयार असून जेव्हा घटना घडली तेव्हा सदावर्ते घटनास्थळी अनुपस्थित होते, सदावर्ते यांना एक दिवसही तुरुंगात ठेवता येईल असा गुन्हा त्यांनी केला नाही, पोलिस कोणालाही उचलून आणतील तर त्यांच्यावर खटला कसा काय चालवायचा, सदावर्ते यांनी पवार यांच्या घरात घुसून आंदोलन करा असं वक्तव्य कधी केले याबद्दल पोलिसांनी पुरावे द्यावे. आम्ही कारवाईला सामोरे जाऊ असं अॅड महेश वासवानी यांनी कोर्टात सांगतिलं.
महेश वासवानी यांनी सदावर्ते यांचा जामिन सादर केला कोर्टात या जामिन अर्जाला सरकारी वकीलांनी विरोध केला.