मुंबई : मंगळवारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे ठप्प तब्बल ११ तास ठप्प असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा आज पहाटेपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेची चर्चगेट ते विरार सेवा मंगळवारी रात्री ११ वाजून 53 मिनिटांनी सुरू करण्यात आली.  तर मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री उशीरा लोकल सेवा कल्याण, कर्जत आणि टिटवाळ्याच्या दिशेनं रवाना करण्यात आल्या. 


मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे सामन्य मुंबईकर कामावर यायला निघाला तेव्हा दिवसभरात त्याच्यापुढे निसर्गानं काय वाढून ठेवलंय. याची कल्पनाच आली नव्हती. वेधशाळनं अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता. तसा सकाळपासून पाऊसही बरसत होता. पण मुंबईला पाऊस काही नवा नाही. पण ११ नंतर वेधशाळेच्या अंदाजाचं खरं रुप दिसायला लागलं. धुंवाधार पावसानं मुंबईच्या मान्सूनपूर्व तयारीची पोलखोल केली.


दिवसभर मुंबईच्या कानकोपऱ्यात तो धुंवाधार बरसत होता...आणि कामावरून घरी कसं जायचं याचिंतेनं मुंबईकरांच्या हृदयचा ठोका चुकत होता. अखेर निसर्गाची सरशी झाली. पावसाचा जोर कमी झाला तरी रस्त्यावर साचलेलं पाणी काही केल्या ओसरत नव्हतं.अनेकांनी आपल्या महागामोलाच्या गाड्या रस्त्यातच सोडल्या. बेस्टच्या बसेसही भर रस्त्यात बंद पडल्या. प्रवासी निघून गेले. पण चालक आणि वाहकांना अख्खी रात्र गाडीतच काढावी लागली.


अनेक मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत घर गाठता आला. अशांनी लाडक्या गणरायाचा आसरा घेतला. कुणी सिद्धिविनायक मंदिरात आसऱ्याला गेला. तर कुणी स्टेशनवर आपली पथारी पसरली. अनेकांनी ऑफिसमध्ये रात्री काढली.


इतरवेळी मुंबईत माणूसकी नाही असं म्हणून शहराला हिणवणाऱ्यांना असा बाका प्रसंग आला. हे शहर अगदी सणसणीत कानाखाली मारतं, पावसात अडकलेला, कोण, कुठला याची कसलीही विचारणा न करता शक्य तिथं शक्य त्या मार्गानं मुंबईकर त्याच्या पाठीशी उभा राहिला.
 
त्याआधी मध्यरेल्वेच्या प्रत्येक स्थानकांवर तासंतास अडकलेले प्रवांशाकडे अन्न पाण्याविना गाडी सुटण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेक जण स्टेशनवरच कित्तेक तास तात्कळ उभे होते.