मुंबई विद्यापिठाची वेबसाईट बंदच, निकालाची वाट
अजूनही ८४ हजार ८०९ उत्तर पत्रिकांची तपासणी बाकी आहे. एकाच दिवसात एवढ्या उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान विद्यापीठासमोर आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने ऑनलाईन उत्तर पत्रिका तपासणीमुळे निकालाच्या डेडलाईन चुकवल्यात. आता न्यायालयात दिलेले ३१ ऑगस्टची निकालाची डेडलाईन सरकारकडून पाळली जाणार का?, याकडं सा-यांच्या नजरा लागल्यात. अजूनही ८४ हजार ८०९ उत्तर पत्रिकांची तपासणी बाकी आहे. एकाच दिवसात एवढ्या उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान विद्यापीठासमोर आहे.
परीक्षा संपून जवळपास साडेतीन महिने पूर्ण झाले असले, तरी अजूनही विद्यार्थ्यांच्या हाती निकाल पडलेले नाहीत. परीक्षा संपल्यापासून 45 दिवसांच्या आत निकाल लावण्याचा विद्यापीठाचा नियम विद्यापीठानेच मोडला. रविवारी डेडलाइन पाळण्यासाठी घाईघाईत बीकॉमच्या ५व्या आणि ६व्या सत्राचे निकाल जाहीर केले. मात्र दुस-याच दिवशी मुंबई विद्यापीठाची वेबसाईट ठप्प झाली. 72 तास उलटल्यानंतरही ही वेबसाईट ठप्पच आहे.
आधीच मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागल्यानं विद्यार्थ्यांचे हाल झालेत. त्यातच तांत्रिक बिघाडामुळं वेबसाइट कोलमडली आहे. त्यामुळं जाहीर झालेले निकालही विद्यार्थ्यांना पाहता येत नाहीत. मग निकाल जाहीर करून तरी काय उपयोग, असा सवाल विद्यार्थी करतायत.