COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अमेझॉननंतर मराठीच्या मागणीला घेऊन मनसेनं मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवलाय.पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा अशी मनसेची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांची पश्चिम रेल्वेला पत्र पाठवून ही मागणी केलीय. मागणी तात्काळ पूर्ण न झाल्यास रेल्वे प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा जितेंद्र पाटील यांनी दिलाय.



महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर अमेझॉन आता मराठी भाषा बोलू लागणार आहे. अमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी केली होती. मनसेच्या या भूमिकेची अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी दखल घेतलीय. अमेझॉन.इन या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य द्या अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. काही दिवसातच ही मागणी मान्य करण्यात आली असून येणाऱ्या दिवसात तुम्हाला अमेझॉन मराठीतून दिसणार आहे.  


अमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात मनसेचे अखिल चित्रे यांनी ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिलाय. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अ‍ॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे या पत्रात म्हटलंय.