मुंबई: आर्थिक बोजामुळे ठप्प झालेल्या जेट एअरवेजला मंगळवारी दोन मोठे धक्के बसले. मंगळवारी सकाळी कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) अमित अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर काहीवेळातच 'जेट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय दुबे यांनीही वैयक्तिक कारण देत कंपनीतून काढता पाय घेतला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळातील अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामुळे अगोदरच रस्त्यावर आलेल्या 'जेट'च्या कर्मचाऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून जेट एअरवेजने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.जेट एअरवेजचा कारभार सुरु ठेवण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. त्यासाठी जेट नव्या गुंतवणूकदारांकडे आस लावून बसली होती. मात्र, कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य न दिल्यामुळे अखेर जेटची सेवा ठप्प झाली. यामुळे जेटचे तब्बल २० हजार कर्मचारी रस्त्यावर आले होते. यामध्ये १६ हजार ऑन पे रोल आणि सहा हजार कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांना स्पाईस जेट आणि विस्तारा एअरलाईन्सने नोकरी देऊ केली होती. 



हवाई सेवा क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी राहिलेल्या जेट एअरवेजवर सध्या स्टेट बँकेचे वर्चस्व आहे. कंपनीकडे स्टेट बँकेसह विविध १८ व्यापारी बँकांचे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ही सेवा सुरू राखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे आंशिक वेतन देण्यासाठी आवश्यक निधी बँकेने नाकारल्याने जेटचा डोलारा पूर्णपणे कोलमडला आहे.