दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कर्नाटक, गोव्यापाठोपाठ राज्यातील काँग्रेसला लवकरच मोठं खिंडार पडण्याची चिन्हं आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच काँग्रेसचे अनेक आमदार भाजप-शिवसेनेच्या संपर्कात आहेत. तर काही आमदारांना फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत भालके, जयकुमार गोरे, सिद्धराम मेहत्रे, कालिदास कोळंबकर, अब्दुल सत्तार, नितेश राणे लवकरच काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. तर भाजपकडूनही काही आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.


लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता विधानसभेततही काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा झटका बसणार आहे. यापूर्वीच काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपावासी झाले आहेत. याशिवाय कालिदास कोळंबकर, अब्दुल सत्तार, भारत भालके हे आमदार भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्याची वाट बघत आहेत. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढपुरात जाऊन काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा पाहुणचार घेतला, त्यांच्याबरोबर राधाकृष्ण विखे-पाटीलही होते. काँग्रेसचे आणखी आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी विखे-पाटील यांनी केलाय.


देशभर भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. तिकीट देतो आणि पैसेही देतो असे सांगून भाजपकडून आमदार फोडले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. 


भाजप-शिवसेना युतीत आपला मतदारसंघ कुठल्या पक्षाच्या वाट्याला आहे. त्या पक्षात जाण्याकडे काँग्रेसच्या आमदारांचा कल आहे. लोकसभेतील पराभवाने खचलेल्या काँग्रेसला लवकरच हा मोठा धक्का बसणार आहे.


लोकसभा निवडणुकीतील भाजपची लाट कायम असल्याने आपण काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जिंकून येणार नाही अशी भावना काँग्रेसमधील आमदारांची झाली आहे. त्यामुळे पुन्हा आमदार होण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक जण भाजपाच्या संपर्कात आहेत. काँग्रेस पक्ष लोकसभेतील पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही. अशातच अनेक आमदार पक्ष सोडणार असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.