मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीनं ज़ोर धरलेला असतानाच आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही पुन्हा एकदा रस्त्यावर उरण्याच्या तयारीत आहे. आरक्षणाच्या बाबतीत या सरकारनं धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप धनगर समाजातर्फे करण्यात आलाय. धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनाला येत्या १ ऑगस्ट पासून सुरवात होणार असून, एक महिन्याच्या आत यावर निर्णय न झाल्यास होणाऱ्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी सरकारनं ठेवावी असा इशारा धनगर समाजातर्फे देण्यात आलाय. विशेष म्हणजे समाजातील भाजपच्या नेत्यांनीच आता सरकारविरोधात लढा पुकारलाय.


पुण्यात कृती समितीची बैठक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पुढील धोरण ठरवण्यासाठी ५ ऑगस्टला पुण्यात कृती समितीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल. बारामतीमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ५ ऑगस्टला बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार-खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे.


धनगर समाजाकडून राज्यव्यापी आंदोलन


धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे. यासाठी राज्यभर मराठा मोर्चाकडून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. आजच लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेऊन १ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलंय.