देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांनंतर आता महाराष्ट्रात सत्तांतर घडण्याची शक्यता आहे, असे भाकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तविले. राजस्थानमधील सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी रामदास आठवले यांनी म्हटले की, राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मध्यप्रदेश नंतर राजस्थान मधील काँग्रेसची सत्ता जाऊन तेथे भाजपची सत्ता स्थापन होईल. त्यानंतर महारष्ट्रात सत्तांतर घडण्याची शक्यता आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जाऊन फायदा नाही - रामदास आठवले

राजस्थानमधील सचिन पायलट यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकासआघाडीचे नेते सावध झाल्याचे समजते. त्यामुळेच काल मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात आज महाविकासआघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा झाली. नंतर या बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हेदेखील सहभागी झाले होते. यावेळी कोरोनाच्या आपत्तीमुळे लांबणीवर पडलेल्या विधानपरिषदेतील १२ राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांकडे आग्रह धरायचा असा निर्णय झाला.
राज्यपालांनी या प्रक्रियेसाठी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली असली तरी आता फारच उशीर होत असल्याने राज्य सरकार आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना विनंती करणार आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वेळकाढूपणाविषयी शंका उपस्थित केली होती. ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाविकासआघाडीचे सरकार पडेल, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यपालनियुक्त सदस्यांची नियुक्ती लांबणीवर टाकण्यात आली आहे. एकदा का भाजपचे सरकार आले की, आपल्याला हव्या त्या लोकांची विधानपरिषदेवर वर्णी लावता येईल, असे मनसुबे भाजप रचत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.