मुंबई : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीची यंदा देशभरात चर्चा झाली. भाजपने येथे जोरदार प्रचार केला आणि मोठं यश मिळवलं. हैदराबादमध्ये मोठे नेते मैदानात उतरले. अमित शहा, जेपी नड्डा, योगी आदित्यनाथ यांनी येथे जोरदार प्रचार केला. ज्यामुळे भाजपने तब्बल 4 जागांवर 48 जागांपर्यंत मोठी झेप घेतली. हैदराबादमध्ये भाजपने मिळवलेल्या या यशानंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. भाजपने हैदराबादमध्ये आखलेली रणनीती मुंबईत ही चालेल का याबाबत विश्लेशक आता चर्चा करु लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद महापालिकेवर तेलंगणा राष्ट्र समितीने आपला झेंडा फडकवला होता. मागच्या वेळी टीआरएसनं 99 जागा जिंकत सत्ता मिळवली. पण या निवडणुकीत त्यांना 55 जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या सर्व जागा या भाजपने मिळवल्या. मागच्या निवडणुकीत भाजपला फक्त 4 जागा मिळाल्या होत्या. पण त्यांनी आता तब्बल 48 जागा जिंकल्या. भाजप महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला. एमआयएम हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.


हैदराबादची निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि तेजस्वी सूर्या यांनी जोरदार प्रचार केला. हिदुत्वाचा मुद्दा यांनी धरुन ठेवला. हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा येथे महत्त्वाचा ठरला. हैदराबादला भाग्यनगर करण्याचं आश्वासन भाजपने दिलं. असं असलं तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजप कोणत्या मुद्दयावर निवडणूक लढवणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


भाजपनं मुंबई महापालिकेसाठी तयारी सुरु केली आहे. शिवसेनेकडून सत्ता मिळवण्यासाठी भाजप जोरदार मैदानात उतरेल. हैदराबादमध्ये तिरंगी लढत होती. मुंबईत महाविकासआघाडी एकत्र निवडणूक लढवणार का याबाबत अजून कोणतीही माहिती नाही. पण मनसे फॅक्टर देखील येथे महत्त्वाचा ठरणार आहे.


मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत लढल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. मुंबईत राष्ट्रवादी वाढवण्यासाठी शरद पवार हा निर्णय घेऊ शकतात. कारण हैदराबाद प्रमाणे मुंबईतही भाजप संपूर्ण ताकद पणाला लावणार यात शंकाच नाही. शिवसेनेचा गड भेदण्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे.


दुसरीकडे भाजप आणि मनसे एकत्र लढतील अशी देखील चर्चा सुरु आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे फॅक्टर जर चालला तर त्याचा फटका शिवसेनेला बसेल. हिंदुत्वाचा मुद्दा मुंबईत चालेल का? की मराठी अस्मितेचा मुद्दा चालेल? याबाबत आता जनताच ठरवणार आहे.