महामंडळाच्या नियुक्त्यांवरून सेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाद
सेना-भाजप पुन्हा आमने-सामने
मुंबई : राज्यातल्या महामंडळाच्या नियुक्त्यांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाद पेटलाय. भाजपनं शिवसेनेला विश्वासात न घेता महामंडळाच्या नियुक्त्या केल्यानं आता शिवसेनेनं कोणत्याही महामंडळावर नियुक्ती करणार नसल्याचा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कुणाचीही नेमणूक महामंडळावर करणार नसल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाईंनी दिली आहे. त्यामुळे युतीत जुळण्याऐवजी आणखीनच दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या विविध महामंडळांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
विदर्भ विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार चैनसुख संचेती तर उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.योगेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदावर भाजप आमदार डॉ. सुनील देशमुख यांची तर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी भाजप खासदार संजयकाका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.