साध्या पद्धतीत लग्न करत शेतमजुराची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २१ हजार रूपयांची मदत
सचिन कसबे, २४ तास, सोलापूर : देशातील जनतेवर कोरोना व्हायरस सारखे जीवघेणे संकट आले आहे. यावेळी आपण स्वतः च्या घरातील आनंददायी क्षणात अधिक डाम डौल न करता आपल्या परीने काहीतरी मदत केली पाहिजे. असा विचार करणाऱ्या एका शेतमजूराने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २१ हजार रूपयांची मदत केली आहे.
माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथील लक्ष्मण माने हे शेतमजूर आहेत. एका साध्या पत्र्याच्या घरात राहून मिळेल तिथे शेतमजुरी करत त्यांनी आपला संसाराचा गाडा चालवला आहे. त्यांचा मोठा मुलगा अजित हा सुध्दा शेत मजूरी करत ट्रॅक्टर चालवत त्यांना मदत करतो. आठ महिन्यापूर्वी अजितचे लग्न उंबरे पागे गावातील जगताप यांची मुलगी पायल सोबत ठरले.
पण घरातील आर्थिक अडचणीमुळे लक्ष्मण यांनी मुलगा अजितचे लग्न लवकर केले नव्हते. शेतमजूरी करत लग्नासाठी लागणाऱ्या रकमेची माने कुटुंबियांनी जमवाजमव केली. लग्नासाठी मे महिन्यातील तारीख निश्चित झाली होती. पण देशभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लग्न करण्याबाबत संभ्रम होता.
अखेर लक्ष्मण माने यांनी घरातच अत्यंत साध्या पध्दतीने दहा नातेवाईकांच्या उपस्थितीत आपला मुलगा अजित आणि जगताप यांची मुलगी पायल यांचा विवाह झाला. सोशल डिस्टन्सिंग पाळत उपस्थितानी मास्क वापरुनच दोघांना नव्या नात्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या शेतमजूराने आपल्या मुलाचे लग्न घरातच अत्यंत साध्या पध्दतीने केले. एवढेच नाही तर माने कुटुंबियांनी लग्नात मोजकाच खर्च करून बचत झालेले २१ हजार रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी दिले आहेत. देशातील जनता कोरोना मुक्त व्हावी यासाठी आरोग्य यंत्रणा पोलीस सफाई कामगार हे दिवसरात्र काम करत आहेत. या लढ्यात आपला खारीचा वाटा म्हणून शेतमजूर कुटूंबाने दिलेली मदत लाख मोलाची आहे.