मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे आपले काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवार यांचं निवासस्थान 'सिल्व्हर ओक'वर अजित पवार दाखल झाले आहेत. या दोघांची चर्चा सध्या सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी केली होती. 'हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं' जाहीर करत पवारांनी आपल्या पक्षाचे आमदार परत आणण्याचा चंग बांधला आणि ते करूनही दाखवलं. अजित पवार यांनीच बंडखोरी केल्यानं शरद पवार यांना राजकीय धक्क्यासोबतच कौटुंबिक धक्काही बसला होता. 


दरम्यान, अजित पवारांना राष्ट्रवादीत परत आणावं, असा आग्रह छगन भुजबळांनी धरलाय. त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत वक्तव्य केलं. तर, 'अजित पवार वुई लव्ह यू' अशी पोस्टरबाजीही समर्थकांनी ट्रायडंट हॉटेलबाहेर केलेली दिसली. एकच वादा, अजित दादा अशा घोषणादेखील या समर्थक दिल्या होत्या.



विधीमंडळ नेतेपदाचे पत्र घेऊन अजित पवार भाजपला जाऊन मिळाले. आपल्याला आमदारांचा पाठींबा असल्याचे त्यांनी राज्यपालांसमोर दाखवून दिले. पण जसजसे दिवस उलटले तसे अजित पवार यांच्यासोबत गेलेले नेते स्वगृही परतले. हे लक्षात आल्यानंतर अजित पवारांनी आपला राजीनामा फडणवीस यांच्याकडे सोपवला. अजित पवार यांनी 'वैयक्तिक कारणामुळे युतीत राहू शकत नाही, असे सांगत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला' असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून स्वत: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपल्याकडे बहुमत नसल्याचंही त्यांनी यावेळी मान्य केलं.