मुंबई: शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघाच्या रिंगणातून अचानकपणे माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच काँग्रेसचे नेतेच बुचकाळ्यात पडल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी शरद पवारांकडून आपला मुलगा पार्थ याच्यासाठी हट्टाने मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पदरात पाडून घेतली. यानंतर शरद पवार यांनी एकाच घराण्यातील किती लोक निवडणूक लढवणार, याला काहीतरी मर्यादा असावी, असे सांगत माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केला होता. पवारांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे विरोधकांसह राष्ट्रवादीचेच नेते चांगलेच गडबडले. राजकीय वर्तुळात शरद पवार यांनी नातवासाठी स्वत: माघार घेतल्याची चर्चा रंगली. त्यामुळे आता यावर काय बोलायचे हा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक न लढण्याचा निर्णय बदला, रोहित पवारांचं आजोबांना आर्जव


खुद्द अजित पवार यांनीही याविषयी बोलायला नकार दिला. 'झी २४ तास'ने अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी अक्षरश: फोनवर बोलत असल्याचे दाखवत प्रश्न टाळला. तीन-चार वेळा प्रश्न विचारूनही अजित पवार आपल्याला काही ऐकूच आले नाही, असे दाखवत होते. त्यामुळे एकूणच शरद पवारांचा निर्णय राष्ट्रवादीसाठी काही प्रमाणात अडचणीचा ठरत असल्याचे दिसत आहे. पवारांना निवडून येण्याची खात्री नसल्यामुळेच त्यांनी माघार घेतली, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर गेल्या काही तासांमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे पवारांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांचा नातू रोहित पवार यांनी 'कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा' असे आवाहन सोशल मीडियावरून आपल्या आजोबांना केले आहे. मात्र, या सगळ्याचा विशेष फायदा होताना दिसत नाही. 


पवार कौटुंबिक कलहाच्या डोहात?