मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. राज्यात वेगवेगळ्या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जनतेला इशारा दिला आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कोरोना नाही असं लोक वागत आहेत. याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे नियमांचे पालन सर्वानी करायला हवं. कोरोनाचे संकट असले तरी विकासाला महत्त्व द्यायचं आहे. पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचा विस्तार करण्याची मागणी होती. त्यामुळे निगडी ते स्वारगेट अशा मेट्रोला आज मंजुरी देण्यात आली. असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे.


मुंबईत सर्वसामान्यांना लोकलने प्रवासाची परवानगी दिल्यानंतर लोकलमध्ये होणारी गर्दी आता वाढू लागली आहे. विशिष्ट वेळेत लोकल प्रवाशाची परवानगी देण्यात आली असली तरी आधी सारखीच गर्दी होत असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. लोकं त्यात नियम पाळत नसल्याने आणि सोशल डिस्टंसिंग शक्य नसल्याने मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.


२२ फेब्रुवारीनंतर लोकल बाबत आढावा घेतला जाणार आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढू लागली तर पुन्हा निर्बंध लागू करण्याचा इशारा याआधीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिला आहे. राज्यातील जिल्हास्तरावर प्रशासन सतर्क असून कोरोनाबाबत आता कठोब पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. येणारे १० दिवस हे महत्त्वाचे आहेत. जर लोकांनी नियम पाळले नाही आणि रुग्णांची संख्या वाढू लागली तर त्यावर नियंत्रण मिळवणं पुन्हा कठीण होऊन जाईल. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे.