दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: नवी मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नाईक कुटुंबीयांविरोधात दंड थोपटले आहेत. नवी मुंबईत काही लोकांची मक्तेदारी होती. परंतु, आता घाबरायची गरज नाही. ज्या गावच्य बोरी, त्याच गावच्या बाभळी, हे लक्षात घ्या, असे सांगत अजितदादांनी गणेश नाईक यांना आव्हान दिले. ते मंगळवारी महाविकासआघाडीच्या वाशी येथील मेळाव्यात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईत नाईक कुटुंबीयांचा दबदबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गणेश नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना महत्त्वाची पदे मिळाली होती. मात्र, वाऱ्याची दिशा ओळखून गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत नाईक घराण्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. 


अजितदादांची धडाकेबाज स्टाईल आम्हाला जमणार नाही- अशोक चव्हाण


या पार्श्वभूमीवर अजितदादांनी आजच्या मेळाव्यात नाईक कुटुंबीयांवर घणाघाती टीका केली. आगामी निवडणुकीनंतर नवी मुंबईत कुणी महापौर होईल, कुणी स्थायी समिती अध्यक्ष होतील, कुणी सभापती होतील, पण नाईक कुटुंबातील कुणी काहीही होणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. 


नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकासआघाडीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी फासे टाकायला सुरुवात केली आहे. कालच यासंदर्भात  महाविकासआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. 


ऐपत असणारेही १० रूपयांच्या थाळीवर ताव मारतात


आमच्या सरकारने १० रुपयांत थाळी सुरु केली. ही थाळी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, काही ठिकाणी मी बघतो की, ज्यांची ऐपत आहे,तो पण थाळीवर ताव मारतो. बाबा असं करू नका, आधी ज्याच्या खिशात पैसै नाही, त्यांना थाळी मिळू द्या. हा सल्ला मी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना देत असल्याचे अजितदादांनी यावेळी सांगितले.