मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बंड केल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यावर एका दिवसानंतर अजित पवार यांनी पहिलं ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटला अजित पवार यांनी रिट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धन्यवाद. आम्ही महाराष्ट्रात स्थिर सरकार देऊ. हे सरकार जनतेच्या कल्याणासाठी मेहनत करेल, असं अजित पवार म्हणाले.







COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सितारामन, राजनाथ सिंग यांच्यासारख्या भाजपच्या दिग्गज नेत्यांचेही अजित पवार यांनी आभार मानले आहेत.


अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटमध्येही बदल केले आहेत. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस असं अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे. 



शनिवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेले काही दिवस नुसत्या चर्चाच सुरु होत्या आणि मागण्या वाढत चालल्या होत्या, त्यामुळे महाराष्ट्रात सरकारची गरज असल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं अजित पवार म्हणाले होते.


अजित पवारांच्या या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही भूमिका नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून काढून टाकण्यात आलं. अजित पवार यांच्याऐवजी जयंत पाटील यांच्याकडे गटनेतेपदाची सूत्र देण्यात आली.