राज ठाकरेंच्या आव्हानानंतर अजित पवारांची शिवसेनेसाठी जोरदार बॅटिंग
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांचं शिवसेनेला आव्हान.
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर सेनेला आव्हान दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. 'शिवसेनेचा प्रवास बाळासाहेबांच्या मार्गानेच सुरू आहे. तुम्हाला मध्येच आरती, अयोध्या कशी आठवते असा सवाल अजित पवारांनी केला आहे. आमच्या आरतीत राजकीय स्वार्थ नाही.'असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.
'राज्यात जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि त्यांनी तयार केलेल्या घटनेमुळे देशातील एकोपा टिकलाय, त्याचा आदर केला पाहिजे.' असंही ते म्हणाले.
सर्वांनी एकत्र सण साजरे करावेत. एकोपा टिकवला पाहिजे. जातीधर्मात तेढ निर्माण होणार नाही, सर्व गुण्यागोविंदाने नांदतील यावर लक्ष दिलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिकवलं आहे. म्हणून आपला देश एकसंघ पहायला मिळतो. श्रीलंका आणि पाकिस्तानची काय अवस्था आहे. असं असताना भारतासारख्या खंडप्राय देशात एकोपा टिकलाय तो केवळ बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे, संविधानामुळे.. त्याचा आदर केला पाहिजे. असं ही अजितदादा म्हणाले
भोंग्यावरून राज्यातलं राजकारण तापलंय. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्याची घोषणा केलीय. विशेष म्हणजे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे देखील अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना-मनसेतली चुरस आणखी रंगण्याची शक्यता आहे.